मिरा-भाईंदर शहराची अगदी एका ओळीत ओळख करून द्यायची झाल्यास आपण या शहराला संस्कृती आणि निसर्ग सौंदर्याने नटलेलं शहर असं म्हणू शकतो. मिरा-भाईंदर शहराला लाभलेलं निसर्गवैभव पाहायचं असेल तर इथल्या उद्यानांची एकदातरी मनसोक्त भटकंती करायला हवी. चला तर मग आज जाऊया मीरा-भाईंदरच्या प्रसिद्ध अशा रामदेव उद्यानात. या उद्यानात प्रवेश करताच इथे आपल्याला विविध प्रकारची रंगीबिरंगी फुलझाडे पाहायला मिळतात, जी पाहताच क्षणी आपलं मन प्रफुल्लित करतात आणि या उद्यानात पुन्हा पुन्हा येण्यास भाग पाडतात. उद्यानातील गोल्डन दुरांता, जायन, टर्फ, पिला, रायनिया, लाल कनिष्क, अरेलिया, फिलाथस, एसिडस, एक्वा, हेमेलिया, पेंटीस, पारिजात, चाफा, एकझोरा, ग्रेबिकस कोलन अशी विविध प्रकारची फुलझाडांचा सुवास आपलं मन ताजतवानं करतात. रामदेव उद्यानातील वनस्पती वैविध्य आपल्या मनाला भुरळ पाडतं. या उद्यानाची खासियत म्हणजे इथला नेत्रदीपक तलाव. हा तलाव इथे फेरफटका मारायला आलेल्या प्रत्येकाचं मन अगदी रिफ्रेश करून टाकतो. तलावाजवळील बेंचेस नागरिकांच्या विश्रांतीसाठी एक उत्तम ठिकाण आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिकेने नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या विविध सोईसुविधांबद्दल बोलायचं झालं तर इथे फिटनेस प्रेमींसाठी ओपन जिम आणि जॉगिंग ट्रॅक आहे, लहान मुलांना खेळण्यासाठी मजेशीर उपकरणे आहेत, नागरिकांच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी इथे उभारण्यात आलेल्या योगा केंद्राला रोज अनेक नागरिक न चुकता भेट देतात. रोज जवळपास दीड हजारांहून अधिक नागरिक मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या या निसर्गरम्य उद्यानाचा आनंद घेतात. हे असं काहीतरी भन्नाट जर तुम्हालाही अनुभवायचं असेल तर निसर्ग चैतन्याचा वरदहस्त लाभलेल्या या रामदेव उद्यानाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.