विविध संस्कृती, सोयीसुविधा आणि निसर्गरम्य परिसराने सजलेल्या मिरा भाईंदरच्या पावनभूमीला अतिशय समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मराठ्यांच्या पराक्रमी इतिहासाची साक्ष देत मिराभाईंदर मधील घोडबंदर किल्ला गेली शेकडो वर्ष मोठ्या दिमाखात उभा आहे. घोडबंदर किल्ल्याला सुमारे पाचशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिका या किल्ल्याचे संवर्धन, संरक्षण व सुशोभीकरण करत आहे. मीरा भाईंदरचे ऐतिहासिक वैभव कायम राहावं आणि या शहराचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिका कायमच प्रयत्नशील राहिली आहे. ऐतिहासिक दृष्ट्या पाहता, सागरावर आपली सत्ता राहावी या उद्देशाने पोर्तुगीजांनी बांधलेल्या किल्ल्यांपैकी हा एक किल्ला. हा किल्ला वसई खाडीच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा समजला जाई. पोर्तुगीजाकडून १७३७ साली चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मोठ्या शौर्याने हा किल्ला जिंकून घेतला. परंतु दुर्दैवाने १८१८ मध्ये तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. ब्रिटिश राजवटीत ह्याच किल्ल्यातून ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय कामकाज चालत असत. त्याकाळी येथे घोड्याचा व्यापार चालत असल्याने किल्ल्याचे नाव घोडबंदर पडले असावे असे सांगितले जाते. चिमाजी आप्पांच्या शौर्याची आठवण अबाधित ठेवणाऱ्या आणि ऐतिहासिक वारसा असणाऱ्या या नेत्रदीपक किल्ल्याचे महत्त्व कायम ठेवण्याचे महत्वपूर्ण कार्य मिरा भाईंदर महानगरपालिका करत आहे. या किल्ल्याच्या आल्हाददायक वातावरणात येताच एक नीरव शांतता आणि ऐतिहासिक जाणिवांनी आपले मन अगदी उत्साहित आणि प्रफुल्लित होऊन जाते. तुम्हीही या पराक्रमी इतिहासाचे साक्षीदार व्हा व आजच या सुंदर किल्ल्याला भेट द्या.