वृक्षवल्ली आम्हा सोयरे… हे ब्रीदवाक्य जोपासणाऱ्या मिरा-भाईंदर महानगरपालिकेने फार पूर्वीपासूनच वृक्षारोपणाला व वृक्ष संगोपनाला प्राधान्य दिले आहे. आरक्षण 305 उद्यानाला भेट देताच मिरा-भाईंदर महानगरपालिका वृक्षसंवर्धनासाठी करत असलेल्या अभूतपूर्व कार्याची आपल्याला प्रचिती येते. मिरा-भाईंदर महानगरपालिकेने अमृतवन योजनेअंतर्गत विविध झाडांची लागवड या उद्यानात केलेली आहे. ज्यात मालपिजिया, तगर, चाफा, जास्वंद, अशा शोभिवंत फुलझाडांसोबतच पपई आणि कडुनिंबाची झाडे सुद्धा आहेत. उद्यानात आलेल्या प्रत्येकाला आपला मोकळा वेळ मनसोक्तपणे घालवता यावा, यासाठी मिरा-भाईंदर महानगरपालिकेने येथे उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी गंमतीदार साधने, तरुणांना व्यायामासाठी ओपन जिम, धावण्यासाठी जॉगिंग ट्रॅक तसेच विश्रांतीसाठी आरामदायी बेंचेस आणि झोपाळ्याची व्यवस्थाही येथे करण्यात आली आहे. या उद्यानाचं वेगळेपण म्हणजे या उद्यानात नागरिकांना योगसाधना आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करता यावेत यासाठी विशेष रंगमंचाची व्यवस्था महानगरपालिकेने येथे केलेली आहे. तसेच या उद्यानात नागरिकांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे यासाठी विरंगुळा केंद्राची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. नागरिकांच्या सेवेसाठी हे उद्यान मिरा-भाईंदर महानगरपालिकेअंतर्गत नेहमीच सुशोभित व स्वच्छ ठेवली जाते. अशा या नितांत सुंदर आरक्षण 305 उद्यानाचा आनंद दररोज जवळपास 1500 हून अधिक नागरिक घेत असल्याचं आपल्याला दिसून येते. मग तुम्ही कधी येताय आरक्षण 305 उद्यानाचा आनंद घ्यायला.