नरवीर चिमाजी आप्पा यांच्या शौर्याने पावन झालेल्या मिरा-भाईंदर शहराला सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक असं एक अलौकिक ऐश्वर्य लाभलेलं आहे. मीरा भाईंदर शहराचं हेच ऐश्वर्य अबाधित राखण्यासाठी मिरा-भाईंदर महानगरपालिका नेहमीच सज्ज आणि तत्पर राहिली आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या याच प्रयत्नांमुळे मीरा भाईंदर शहर हे आज एक निसर्गसंपन्न शहर म्हणून ओळखले जाते. मिरा भाईंदर शहराचे निसर्ग सौंदर्य हे अतुलनीय आहे. मिरा-भाईंदर शहरावर निसर्ग किती प्रसन्न आहे हे पाहण्यासाठी इथल्या उद्यानाचा फेरफटका एकदा तरी मारायलाच हवा. चला तर मग आज आरक्षण 269 उद्यानाचा फेरफटका मारुया. उद्यानात प्रवेश करताच इथली हिरवळ आपल्या डोळ्यांना व मनाला एक वेगळाच उत्साह देते. उद्यानाचा परिसर एक्झोरा, ख्रीस्टीना, फायकस, मोरपंखी, तगर, बाभळ, पाम, तुळस अशा मनमोहक फुलझाडांनी बहरल्याचं दिसून येतं. इथल्या आकर्षक फुलझाडांच्या ताटव्याकडे पाहून आपलं मन प्रफुल्लित होते. पालिका कर्मचार्यांकडून या फुलझाडांची वेळोवेळी खतपाणी घालून मशागत केली जाते. अमृतवन अभियानाअंतर्गत पक्ष्यांच्या भ्रमण आणि त्यांच्या विसाव्यासाठी महानगरपालिकेद्वारे अनेक झाडांची लागवड येथे करण्यात आली आहे. हे उद्यान म्हणजे वनस्पतीच्या विविध जातींचे एक आश्रयस्थान आहे. इथल्या निसर्ग सौंदर्यासोबतच येथे येणाऱ्या नागरिकांसाठी सुसज्य असे जॉगर्स ट्रॅक, लहान मुलांना खेळण्यासाठी गंमतीदार साधने, जम्पिंग ग्रास, तरुणांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी व व्यायामासाठी ओपन जिम आणि योगा ठिकाणाची व्यवस्था मिरा-भाईंदर महानगरपालिकेने अगदी उत्तमरित्या केल्याचे इथे दिसून येते. येथील आरामदायी बेंचेस म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या विसाव्यासाठीची उत्तम सोय. या उद्यानातील होडीच्या आकाराचा देखावा आणि इथला आकर्षक सेल्फी पॉइंट ही तर इथे भेट दिलेल्या प्रत्येकाची अगदी आवडीची ठिकाणं. अशा या निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या निसर्गसंपन्न उद्यानाची भटकंती करायला तुम्ही कधी येताय इथे?