सदरचे गर्द हिरवळ, सुखावणारी शांतता आणि स्वच्छ परिसर, आपला मोकळा वेळ आनंदात व उत्साहात जावा यासाठी याहून आणखी काय हवं? पण हे सारे काही एकत्र अनुभवायचे असेल तर तुम्हाला मीरा भाईंदर मधील प्रसिद्ध आरक्षण 93 उद्यानाचा फेरफटका मारायलाच हवा. हे उद्यान म्हणजे मीरा भाईंदर मधील अनेकांसाठी पहाटेचा गारवा आणि शांतता अनुभवण्याचे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. या उद्यानाशी एक जिव्हाळ्याचे व आपुलकीचे नाते निर्माण झाले असल्याचं इथे येणारे नागरिक म्हणतात. उद्यानातील गर्द हिरवी वृक्षे आणि विविध प्रकारची रंगीबिरंगी फुलझाडे इथे येणाऱ्या प्रत्येकाच्याच मनाला भुरळ पाडतात. मिरा-भाईंदर महानगरपालिकेने अमृत वन योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या सुमारे 300 ते 400 झाडांची लागवड या उद्यानात केली आहे. महानगरपालिकेद्वारे या वृक्षांची उत्तम निगा राखली जाते. उद्यानाचा शांत व स्वच्छ परिसर इथे येणाऱ्या प्रत्येकालाच इथे पुन्हा पुन्हा येण्यास भाग पाडतो. लहान मुले आणि तरुणवर्गासोबतच ज्येष्ठ नागरिकांचाही या उद्यानाकडे ओढा असतो. अनेक तरुणांच्या दिवसाची सुरुवात इथल्या ओपन जिममधील व्यायामाने होते. मिरा भाईंदर महानगरपालिकेद्वारे लहान मुलांना खेळण्यासाठी गंमतीदार साधनांची व्यवस्थाही या उद्यानात करण्यात आली आहे. सोबतच या उद्यानात ज्येष्ठ नागरिकांच्या विश्रांतीसाठी आरामदायी आसनांची व्यवस्थाही मिरा भाईंदर महानगरपालिकेद्वारे करण्यात आलेली आहे. अनेक आजी आजोबा आपल्या नातवंडांसोबत या उद्यानात फेरफटका मारताना दिसतात. सुमारे 1360 चौरस मीटर परिसरात उभारण्यात आलेल्या या उद्यानात नागरिकांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी सुसज्ज असा जॉगिंग ट्रॅकही तयार करण्यात आला आहे. शिवाय उद्यानात शौचालयाची सुविधाही महानगरपालिकेद्वारे पुरवण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक अलंकारांनी व उत्तम सोयीसुविधांनी सजलेले हे उद्यान मिरा-भाईंदरवासीयांच्या पसंतीचे ठिकाण बनले आहे. दररोज सुमारे १३०० ते १४०० नागरिक या उद्यानाला आवर्जून भेट देतात. तुम्हीही जर अजून या सुंदर उद्यानाला भेट दिली नसेल तरी या उद्यानाला नक्की भेट द्या.