विविध संस्कृतींनी नटलेल्या आणि निसर्ग सौंदर्याने बहरलेल्या मिरा-भाईंदर शहरामध्ये फिटनेसप्रेमी नागरिकांची काही कमी नाही. तुम्हीही जर मिरा भाईंदर मध्ये राहत असाल आणि त्यातही तुम्ही फिटनेसप्रेमी किंवा योगप्रमी असाल तर मिरा-भाईंदर मधील प्रसिद्ध आरक्षण 242 उद्यान हे तुमचं रोजचं ठिकाण होऊन जाईल असं समजा. मिरा-भाईंदर महानगरपालिकेने स्थापन केलेल्या 242 उद्यानातील “स्वामी विवेकानंद” योगा केंद्रात जवळपास 500 हून अधिक नागरिक दररोज योग साधनेचा लाभ घेताना दिसतात. या उद्यानाची आणखी एक खासियत म्हणजे मिरा भाईंदर महानगरपालिकेने या उद्यानात स्थापित केलेले थोर महापुरुषांचे आकर्षक पुतळे. या महापुरुषांच्या पुतळ्यांकडे पाहताच त्यांचे कर्तृत्व आपल्या डोळ्यासमोर येते आणि आपल्यालाही एक समाजकर्तव्याची व परोपकराची जाण होत असते… या उद्यानाचे सौंदर्य अजून खुलवण्यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिकेने या उद्यानात ख्रिसमस ट्री, मोरपंख झाड, लिली, पेंडमल्स, फायकस, मालपिजिया, चाफा अशा अनेक मनमोहक फुलझाडांची लागवड येथे केली आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेने स्थापन केलेले बोटॅनिकल उद्यान परीक्षण केंद्र म्हणजे या उद्यानाचे विशेष आकर्षण. या उद्यानात भटकंती करण्यासाठी आलेल्या नागरिकाचा पाय इथून निघणार नाही अशा उत्तम सुविधा महानगरपालिकेने इथे उपलब्ध करून दिल्याचं आपल्याला दिसून येतं. या उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी आकर्षक उपकरणे आहेत, फिटनेसप्रेमी तरुणांसाठी खुली व्यायाम शाळा आणि योगा केंद्र आहे, ज्येष्ठ नागरिकांच्या विसाव्यासाठी आरामदायी बेंचेस आहेत. अशी एकंदरीत उत्तम सुविधा मिरा भाईंदर महानगरपालिकेने येथे केल्याचे आपल्याला दिसून येते. या उद्यानाला भेट दिलेल्या प्रत्येक नागरिकाला या उद्यानाला पुन्हा पुन्हा यावेसे वाटेल अशी काहीतरी वेगळीच जादू या उद्यानात असल्याचे इथले नागरिक म्हणतात. मग तुम्ही कधी येताय या उद्यानाची जादू अनुभवायला!