सृष्टीसौंदर्याने नटलेल्या मिरा भाईंदर शहरातील सारीच उद्याने निसर्गरम्य आणि मनमोहक असल्यामुळे तिथे सकाळ-संध्याकाळ नागरिकांचा ओढा असतो. त्यातीलच एक उद्यान म्हणजे आरक्षण 216 उद्यान. अगदी पहाटेपासूनच हे उद्यान सर्वासाठी खुले होते. मीरा-भाईंदर भागांतील अनेक नागरिक येथे फेरफटका मारायला येतात. हे उद्यान अनेकांसाठी पहाटेचा गारवा आणि शांतता अनुभवण्याचे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. सकाळी तरुण तरुणींसह ज्येष्ठ नागरिक येथे मनसोक्त भटकंती करण्यासाठी येत असतात. त्यात महिलांची संख्याही अधिक असते. ज्येष्ठ नागरिक, निवृत्त मंडळी येथे विसाव्यासाठी येत असतात. उद्यानात चालण्यासाठी कडेला एक जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. सकाळी या जॉगिंग ट्रॅकवर फिटनेस प्रेमींची वर्दळ पाहायला मिळते. शिवाय बालगोपाळांना बागडण्यासाठी इथे गमतीदार साधने आहेत त्यामुळे अनेक आजी-आजोबा आपल्या नातवंडांसह येथे येताना दिसतात. आपल्या रक्ताच्या नात्यांसह एक वेगळे मित्रत्वाचे नाते येथे आल्याने तयार होत असल्याच्या भावना येथे येणारी ज्येष्ठ पुरुष मंडळी सांगतात. मीरा भाईंदर महानगरपालिकेने उद्यानातील परिसर हिरवागार वृक्षांनी अगदी बहरून टाकला आहे. रंगीबेरंगी फुलझाडे आपल्या मनाचा ठाव घेतात. मीरा-भाईंदर महानगरपालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी चांगली आसनेही इथे उपलब्ध करून दिली आहेत. या उद्यानाचे विशेष आकर्षण म्हणजे येथे उभारण्यात आलेले विविध वाद्यांचे मूर्तीरुपी आकर्षक देखावे. वीणा, हार्मोनियम, बासरी इत्यादी वाद्यांचे आकर्षक देखावे या उद्यानाचे सौंदर्य आणखीनच खुलवतात. नागरिकांना विविध सार्वजनिक कार्यक्रम उत्साहाने साजरे करता यावेत यासाठी येथे खुल्या रंगमंचाचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सततच्या प्रयत्नांमुळे वर्षानुवर्षे या उद्यानाच्या सौंदर्यात भर पडत आली आहे. तुम्हालाही जर इथल्या मजा-मस्तीचे, निरव शांततेचे आणि निसर्गरम्य देखाव्याचे साक्षीदार व्हायचे असेल तर आजच या सुंदर उद्यानाला भेट द्या.