ज्या ठिकाणी अलौकीक निसर्ग सौंदर्य आणि उत्तम सोईसुविधा एकत्र येतात अशा ठिकाणी आपला मोकळा वेळ घालवता यावा अशी आपल्या प्रत्येकाचीच इच्छा असते. तुम्ही सुद्धा असं एखादं ठिकाण शोधत असाल तर आरक्षण २९९ उद्यान तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. या उद्यानात येताच “सत्यमेव जयते” या राष्ट्रीय ब्रीदवाक्यातून आपल्याला एक सकारात्मक संदेश आणि राष्ट्रीय ऐक्याची जाणीव करून दिली जाते. मिरा-भाईंदर महानगरपालिकेने या उद्यानात अमृतवन योजनेअंतर्गत तुळस, कडूनिंब, बकुळ अशा विविध प्रकारच्या शोभिवंत झाडांची लागवड केलेली आहे. उद्यानात लावलेल्या या फुलझाडांची महानगरपालिकेद्वारे नेहमीच खतपाणी घालून उत्तम मशागत केली जाते. तसेच या उद्यानातील सुंदर वळणदार रस्ते आपल्याला चालण्यासाठी मोहित करतात. इथे आलेल्या प्रत्येकालाच ही जागा आपली वाटावी यासाठी मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडून नागरिकांसाठी इथे अनेक सोयी सुविधा पुरविण्यात येत आहेत. या उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी गंमतीदार साधने आणि क्रीडा संकुलाची व्यवस्था तर आहेच, सोबतच फिटनेस प्रेमींसाठी खुली व्यायाम शाळा, धावण्यासाठी जॉगिंग ट्रॅक, खेळण्यासाठी हॉलीबॉलची सुविधाही महानगरपालिकेने इथे उपलब्ध करून दिली आहे. इथे उपलब्ध असलेले आरामदायी बेंचेस ज्येष्ठ नागरिकांना घटकाभर मनसोक्त विश्रांतीचा आनंद देतात. या उद्यानाबाबतची आणखी एक विशेष बाब म्हणजे उद्यानात नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही मीरा भाईंदर महानगरपालिकेद्वारे करण्यात आली आहे. शिवाय नागरिकांच्या आवडीनिवडी जोपासण्यासाठी येथे विरंगुळा केंद्राची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. अशा या सर्व सोयी सुविधांनी संपन्न अशा उद्यानाला जवळपास 2000 हून अधिक नागरिक नेहमीच भेट देतात. तुम्हीही जर अजून या सुंदर उद्यानाला भेट दिली नसेल तरी या उद्यानाला नक्की भेट द्या.